एसएच-४४ महामार्गाच्या रखडलेल्या कामाला सुरुवात; बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा (पानाचे) येथे एसएच-४४ महामार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे वारंवार अपघात होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी २५ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलन सुरू होताच प्रशासनाने दखल घेत कामाला तातडीने सुरुवात केली. तसेच ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करण्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन यशस्वी झाल्याची माहिती श्रीकांत बरकले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. कुऱ्हा (पानाचे) परिसरातील एसएच-४४ महामार्गावरील किलोमीटर ५८/०० ते ६०/०० या अंतरातील रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे. ठेकेदाराने काम सुरू करून पुन्हा बंद ठेवल्याने महिला, शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मंजुरी मिळूनही काम अपूर्ण का, काम बंद ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का होत नाही आणि नागरिकांनी आणखी किती दिवस त्रास सहन करायचा, असे प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून लेखी आश्वासन द्यावे, अशी भूमिका घेतली. आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आणि मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात योगेश पाटील, अतुल पाटील, श्रीकांत बरकले, किशोर रोनखेडे यांच्यासह समस्त ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चौकट : पोलीस निरीक्षकांची मध्यस्थी आंदोलन सुरू होताच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी मध्यस्थी केली. प्रत्यक्ष पाहणी करून रखडलेल्या कामाला सुरुवात करण्याबाबत त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या मध्यस्थीमुळे प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा होऊन आंदोलनावर तोडगा निघाला.



