ताप्ती पब्लिक स्कूलचा उपक्रम; स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करत काढली ‘वृक्ष दिंडी’

भुसावळ (प्रतिनिधी ) - येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शाळेच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरासह विविध भागांमध्ये वृक्षदिंडी रॅली काढून 'झाडे लावा,झाडे जगवा' असा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाली. याप्रसंगी शाळेच्या आवारात आंबा,कडुलिंब,वड,पिंपळ,जांभूळ,पेरू,डाळिंब आणि चिकू यांसारख्या विविध प्रकारच्या फळझाडांची व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात प्रिन्सिपल नीना कटलर,व्हाईस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर,अनिता कोळी,अनघा पाटील,हर्षला पाटील,मनीषा कीरंगे,अँनेट मॅथ्यू,आकाश परदेशी व विजय संकत व विद्यार्थी आदींनी सहभागी होत वृक्षारोपण केले.

घोषणांनी परिसर दुमदुमला वृक्षारोपणानंतर शाळेच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने पर्यावरण जनजागृतीसाठी 'वृक्ष दिंडी रॅली' काढली. हातात लहान रोपे व पर्यावरण संदेशांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी परिसर पिंजून काढला. स्कूल परिसरातील शिव कॉलनी,विकास कॉलनी,गायत्री नगर आणि महेश नगर या भागातून ही रॅली काढण्यात आली.'झाडे लावा, झाडे जगवा' अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

किमान एक झाड जगवा: निना कटलर
 यावेळी मार्गदर्शन करताना प्रिन्सिपल नीना कटलर यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले.केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्याचे संगोपन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शाळेचा हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.

फोटो कॅप्शन - भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वृक्षारोपण करताना प्रिन्सिपल नीना कटलर व इतर.