दावत-ए-इस्लामी इंडिया व GNRF तर्फे भुसावळात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश


भुसावळ (प्रतिनिधी) : बदलते हवामान, सातत्याने वाढणारे तापमान आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज वेल्फेअर फाउंडेशन) तर्फे दरवर्षी १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत देशव्यापी विशेष वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत देशभरात लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

या मोहिमेच्या अनुषंगाने भुसावळ येथील मुस्लिम कॉलनी परिसरातील उस्मानिया मशिदीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांच्या संगोपनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी दावत-ए-इस्लामी इंडिया, जळगाव जिल्हाध्यक्ष झुबैर अत्तारी यांनी सांगितले की, GNRF चे यंदाचे उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्यात किमान १,२०० वृक्षांची लागवड करण्याचे आहे. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अधिकाधिक झाडे लावावीत आणि त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले. भावी पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोएब अत्तारी, साबीर इकबाल, जहांगीर शेख, अब्दुल सईद, मतीन इंजिनिअर, फरीद शेख, युसुफ खान, जोएब शेख, आबिद मदनी, हाजी तनवीर, साबीर मेंबर, खालिद अत्तारी, हाफिज कासिम तसेच GNRF चे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन यांनी विशेष सहकार्य करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.