भुसावळ, ( प्रतिनिधी ): आषाढी वारीचे औचित्य साधत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या १८ सायकलवारकऱ्यांनी गुरुवारी पहाटे ६ वाजता येथील श्री विठ्ठल मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या प्रस्थान सोहळ्यास असोसिएशनचे धावपटू, महिला धावपटू तसेच सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सायकलवारकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह द्विगुणित केला.या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि वारकरी परंपरेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. "विठ्ठल नामाचा गजर" करत आणि भक्तिमय वातावरणात या पथकाने पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. या सायकलवारीदरम्यान सुमारे ४३० किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून मार्गात दोन ठिकाणी मुक्काम करण्यात येणार आहे. दररोज सुमारे १७० किलोमीटर अंतर सायकलवरून पार करत हे सर्व सायकलवारकरी शनिवारी तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथे पोहोचणार आहेत. पंढरपूर येथे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सायकलवारकऱ्यांसोबत हे सर्वजण महाराष्ट्रातील प्रसिद्ध रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण फालक तसेच विश्वस्त सचिन अग्रवाल, प्रवीण वारके आणि प्रवीण पाटील यांच्या हस्ते असोसिएशनचा झेंडा दाखवून सायकलवारीला शुभारंभ करण्यात आला. सर्व सायकलवारकऱ्यांना सुरक्षित, यशस्वी आणि मंगलमय वारीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. सायकलवारीत सहभागी सायकलपटू : प्रवीण फालक, जगदीश रेहपाडे, युवराज सूर्यवंशी, विश्वनाथ पावरा, अरुण शिंदे, भाऊसाहेब पाटील, मनोज चौधरी, तुषार पोतरवार, गजानन पाटील, अनंता पाटील, मधुकर इंगळे, विद्याधर इंगळे, समीर चौधरी, डॉ. राहुल भोईटे, मनोहर पाटील, सचिन काळे, केतन बुचडे आणि विनय बडगुजर. *फोटो कॅप्शन* : भुसावळ येथील श्री विठ्ठल मंदिरातून पंढरपूर वारीसाठी सायकलद्वारे प्रस्थान करणारे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे १८ सायकलपटू. यावेळी अध्यक्ष प्रवीण फालक, विश्वस्त सचिन अग्रवाल, प्रवीण वारके, प्रवीण पाटील तसेच असोसिएशनचे धावपटू, महिला धावपटू व सायकलपटू उपस्थित होते.


