फलटण (सातारा), दि. ९ जुलै : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. घरासमोरील केबलच्या सपोर्ट वायरमध्ये विद्युत प्रवाह आल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण खामगाव गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये सतीश शिंदे, गंगुबाई शिंदे, आरती शिंदे आणि सचिन शिंदे यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरती शिंदे ही पोलीस भरतीची तयारी करत होती. दररोजप्रमाणे बुधवारी पहाटे धावण्याचा सराव करून ती घरी परतत असताना घराजवळील केबलच्या सपोर्ट वायरच्या संपर्कात आली. त्या वायरमध्ये विद्युत प्रवाह आल्याने तिला जोरदार विजेचा धक्का बसला. आरतीचा आक्रोश ऐकून तिचे आई-वडील आणि भाऊ तिला वाचवण्यासाठी तातडीने धावले. मात्र, परिसरात ओलावा असल्याने विद्युत प्रवाह जमिनीवरही पसरला होता. त्यामुळे एकामागून एक चौघेही विजेच्या संपर्कात आले आणि काही क्षणांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिल्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या दुर्घटनेमागील नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. शिंदे कुटुंब अत्यंत कष्टाळू असून ऊसतोड मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आरतीला पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे मोठे स्वप्न होते. मात्र, एका दुर्दैवी अपघाताने तिच्यासह संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेले. या घटनेमुळे खामगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.....


