भुसावळ बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक मोहीम; ५२ वाहनांवर कारवाई, २७,५०० रुपयांचा दंड

भुसावळ (प्रतिनिधी) : मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार तसेच राज्याचे परिवहन मंत्री यांच्या निर्देशान्वये भुसावळ बस स्थानक व परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते १० जुलै २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ५२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी बस स्थानक परिसरात महामंडळाच्या अधिकृत वाहनांव्यतिरिक्त कोणत्याही खाजगी वाहनांना प्रवासी भरणे, उतरवणे किंवा वाहन उभे करणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने संपूर्ण जळगाव विभागात विशेष मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (ता. ७) जळगाव विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव यांनी भुसावळ बस स्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी भुसावळ वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संयुक्त कारवाईदरम्यान बस स्थानक परिसरात विनापरवाना व अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना समज देण्यात आली, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या वेळी जळगाव विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव, भुसावळचे आधार व्यवस्थापक राकेश शिवदे, बस स्थानकाचे स्टँड इन्चार्ज जयेश लोहार तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोहिमेच्या सातव्या दिवसापर्यंत ५२ अवैध वाहनांवर कारवाई करून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. १० जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, अवैध प्रवासी वाहतुकीविरोधातील कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.