परभणी,(प्रतिनिधी ) - दि. 9 जुलै 2026 : मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मध्यरात्री भूकंपाचे सलग धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी झालेल्या मुख्य भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदविण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील शिरळी (ता. वसमत) परिसर हा भूकंपाचा केंद्रबिंदू असून तेथे 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का आणि सुमारे 10 किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद झाली. मुख्य धक्क्यानंतर पहाटे 2.15 वाजता 3.6, 2.17 वाजता 3.9 आणि 3.23 वाजता 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे आणखी धक्के बसले. या धक्क्यांचे केंद्रबिंदू काकडदाभा (ता. औंढा नागनाथ) परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भूकंपाचे धक्के वसमत, हिंगोली, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये अधिक तीव्रतेने जाणवले. नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर आणि निळा रोड परिसरातील नागरिकांनाही धक्के जाणवले. अनेक नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेत रात्र जागून काढली. भूकंपामुळे काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. आमदरी येथे एका घराची भिंत कोसळली असून सुमारे 10 ते 12 घरांना तडे गेले आहेत. तसेच पांगरा शिंदे गावात 50 ते 60 घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. नुकसानीची तातडीने पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये : जिल्हाधिकारी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहे. संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठेही नुकसान झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच समाजमाध्यमांवर भीती निर्माण करणारे किंवा अप्रमाणित संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.


