जळगाव (प्रतिनिधी) - लंडनच्या ओमनीडे गॅलरीत आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन सुरू आहे. जगभरातील २३ कलाकारांना या प्रदर्शनात निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातून जामनेर तालुक्यातील काळखेडाचे चित्रकार जितेंद्र सुरळकर अर्थात पिसुर्वाेंचे अग्निपथ पेंटिंग आणि मुंबईचे ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप चंद्र यांच्या फाेटाेग्राफीला संधी मिळाली. हे प्रदर्शन २३ जुलैपर्यंत चालणार आहेे. प्रदर्शनाचे क्यूरेशन राधा बिनाेद शर्मा यांनी केले आहे. ते युकेतील नाेंदणीकृत आयएमए फाउंडेशन आणि भारतातील स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था जागतिक स्तरावरील कलागुणांना प्राेत्साहन देते. समकालीन कला, लुप्तप्राय कला आणि भारतातील आदिवासी कला जतन करण्यासाठी समर्पित आहे. सन २००९पासून भारत आणि युनायटेड किंगडममध्ये या संस्थेतर्फे अनेक सांस्कृतिक व कलाविषयक उपक्रम राबवण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विविध पिढ्या, संस्कृती आणि देश यांच्यात कलेच्या माध्यमातून सेतू निर्माण करणे हा आहे. आंतरराष्ट्रीय कलाकारांना एका छताखाली आणून त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरून संवाद साधला जाताे. त्यात यंदा खान्देशातून पिसुर्वाेंना मानाचे पान मिळाले. पिसुर्वाेंचे पेटिंग सातासमुद्रापार चित्रकार पिसुर्वाे यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ कवितेचा आधार घेऊन हे पेटिंग रेखाटले आहे. ‘संघर्षाच्या मार्गावर चालताना काेणाकडूनही आधाराची अपेक्षा न करता स्वत:च्या ध्येयासाठी खंबीरपणे पुढे चालत रहावे’ असा तिचा आशय आहे. ताेच त्यांनी रंग, रेषा आणि कुंचल्यांच्या फटकाऱ्यांतून अधाेरेखीत केला आहे. जगभरातील कलारसिकांना ही कलाकृती भूरळ घालत असल्याने मन भरून येत असल्याची भावना त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली. *‘अग्निपथ’चे लाइव्ह चित्रीकरण* मुंबईचे छायाचित्रकार प्रदीप चंद्र यांनी ‘अग्निपथ’ चित्रपटाच्या लाइव्ह शुटींगमध्ये अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र टिपले हाेते. त्याचा समावेश या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात करण्यात आला आहे. ते केवळ छायाचित्रकारच नव्हे तर लेखक, चित्रकारही आहेत. त्यांची कला आणि पत्रकारितेतील कारकिर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे. त्यांची चित्रकार एम. एफ. हुसेन, अभिनेता आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर लिहिलेली पुस्तकेही गाजली आहेत.



