आई मला जन्म घेऊ दे’ कविता आता एम.ए.च्या अभ्यासक्रमात एरंडाेलचे कवी वा. ना. आंधळेंच्या साहित्याचा सन्मान

भुसावळ(प्रतिनिधी) - एरंडोलचे कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची "आई, मला जन्म घेऊ दे’ या कवितेचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या पदव्युत्तर एम. ए. मराठी अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. ‘साहित्य समीक्षा : सिद्धांत आणि उपयोजन'' या अभ्यास पत्रिकेत ही कविता आहे. विद्यापीठाचे या संदर्भातील पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आस्वादक समीक्षा पद्धती अभ्यासता येईल. अभ्यास मंडळाच्या या उद्दिष्टाचा कवी आंधळे यांनी आनंद व्यक्त केलाय. ‘आई, मला जन्म घेऊ दे!'' या स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधातील भावकवितेला प्रचंड जनाधार लाभला असून या कवितेचे यामुळेच तब्बल पंचेचाळीस भारतीय भाषेत व बोली भाषेत उत्स्फूर्त अनुवाद झाले आहेत.

*15 वर्षात 1 लाख पोस्टर*
सेवाभावी सामाजिक संस्था आणि सुधारकांनी गेल्या पंधरा वर्षात या कवितेचे अदमासे एक लाख पोस्टर प्रकाशित केले. यापूर्वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे यांनी युवकभारतीच्या पाठ्यपुस्तकात सन २०१६मध्ये या कवितेला इयत्ता अकरावीकरिता समाविष्ट केले होते.

*गुजरात राज्यातही डंका*
गुजरात राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये गुजरात माध्यमिक आणि उच्चस्तर माध्यमिक शिक्षण बोर्ड गांधीनगर यांनी इयत्ता १२वी विज्ञान या बोर्डाच्या प्रश्न पत्रिकेत ‘आई, मला जन्म घेऊ दे'' ही संपूर्ण कविता प्रदर्शित करीत त्यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले.