भुसावळात रेशन दुकानदारांची आज आढापीवा बैठक; विविध प्रलंबित प्रश्नांवर होणार चर्चा

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील रेशन दुकानदारांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शुक्रवार, 5 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास उपाध्याय आणि तालुका अध्यक्ष महेंद्र सपकाळे यांनी दिली.

रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना ठरविण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुकानदारांना मिळणारे कमिशन वेळेवर मिळत नसल्याने निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी, ई-पॉस मशीनवरील सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरणात येणारे अडथळे आणि त्यामुळे लाभार्थी व दुकानदारांमध्ये निर्माण होणारे वाद, तसेच सक्ती, इस्टांक वाढविणे आणि धान्य कोट्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

बैठकीत जळगाव जिल्हा संघटनेचे जिल्हा सचिव सुनील अंभोरे, राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास उपाध्याय तसेच तालुका अध्यक्ष महेंद्र सपकाळे हे दुकानदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीस तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील, तालुका सचिव उल्हास भारसके, शहराध्यक्ष आरिफ मिर्झा आणि महिला मंडळाच्या तालुकाध्यक्ष टीना धांडे यांनी केले आहे.