जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे वृक्षारोपण

भुसावळ (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हायवे आयटीआय कॉलेजसमोर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘झाडे लावा, झाडे वाचवा’ हा संकल्प जोपासणाऱ्या संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील व पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना मनीषा पाटील यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. मानवी जीवन निसर्गावर अवलंबून असून, निसर्गाचे संतुलन टिकवण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या उपक्रमांतर्गत वड, कडुलिंब, करंज, कदंब, काशीद, पिंपळ आणि औदुंबर यांसारख्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. शुद्ध हवा, थंडगार सावली आणि पर्यावरण संतुलनासाठी उपयुक्त असलेल्या या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने स्वीकारली आहे.

यावेळी वंदना मंडावरे, किमया पाटील, नूतन तासखेडकर, नेहा जगताप, संतोष जगताप, रेणुका हिंगू, हर्षा गुजराती, स्मिता पाटील, तेजल वनरा, नेहा मौर्य, चेतन सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.