जळगाव ( प्रतिनिधी ) –

शहरातील अजिंठा चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत १६.११ ग्रॅम एमडी ड्रग्जसह कार, दोन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना शहरात काही जण एमडी ड्रग्जची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ४ जून रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सुरेशदादा जैन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पोलिसांनी सापळा रचला.
संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी एस-क्रॉस कारची झडती घेतली असता कारमधील तिघांकडे अंमली पदार्थ आढळून आला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळीच प्राथमिक तपासणी केली असता जप्त करण्यात आलेली पावडर एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी संशयित आरोपी रईस हारुन देशमुख (२७, एमआयडीसी पोलीस कॉलनी, जळगाव) , तौसिफ सैय्यद आरिफ (२१, पिंप्राळा हुडको, जळगाव) , कृणाल उर्फ लकी रमेश पाटील (३०, देविदास कॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी हा अंमली पदार्थ इतर साथीदारांकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे तसेच, त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात जप्त केलेला मुद्देमाल एमडी अंमली पदार्थ (१६.११ ग्रॅम) – ४८,०००, हजार, मारुती सुझुकी एस-क्रॉस कार – ४,००, ०००हजार , स्प्लेंडर प्लस मोटारसायकल – ५०,००० हजार, बजाज पल्सर मोटारसायकल – ७५,००० हजार, ३ मोबाईल फोन – ८०,०००हजार , एकूण जप्त मुद्देमाल : ६लाख,५३,००० हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल मुरलीधर चुडामण धनगर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, आणि प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, जितेंद्र वल्टे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, जयंत चौधरी, तसेच पोलीस अंमलदार सुनील दामोदरे, अकरम शेख, मुरली धनगर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, बबन पाटील, यशवंत टहाकळे, सलिम तडवी, रफिक शेख, राहुल रगडे, मयुर निकम, रवींद्र चौधरी, ईश्वर पाटील, राहुल कोळी, गोपाळ पाटील, विलास गायकवाड, प्रदीप सपकाळे, रविंद्र कापडणे, प्रदिप चौरे आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या बजावली आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अंमली पदार्थांची विक्री अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जळगाव पोलीस दल कठोर कारवाई करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


