रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार व CPR चे प्रशिक्षण; विद्युत लोको शेडमध्ये एकदिवसीय शिबिर संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी): येथील रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये कर्मचारी व तंत्रज्ञांसाठी नुकतेच एकदिवसीय ‘प्राथमिक प्रथमोपचार आणि विद्युत शॉक ट्रीटमेंट’ प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. शेडचे वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता चाणक्य जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश रेल्वे कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदत करण्यास सक्षम बनविणे हा होता.

यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून भुसावळ विभागीय रेल्वे रुग्णालयाचे डीएमओ डॉ. जितेश ठाकूर उपस्थित होते. त्यांनी अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रथमोपचाराच्या विविध तंत्रांची सविस्तर माहिती दिली.

प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण

शिबिरात विद्युत लोको शेडमधील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. कर्मचाऱ्यांकडून विविध आपत्कालीन परिस्थितींची हाताळणी करून घेण्यात आली.

या विषयांवर मार्गदर्शन

धोक्यापासून बचाव व रेस्क्यू: विद्युत अपघात झाल्यास पीडित व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या पद्धती.

एअर सर्क्युलेशन व श्वसनक्रिया: श्वासोच्छ्वास बंद झाल्यास श्वसनक्रिया पूर्ववत करण्याचे उपाय.

CPR प्रशिक्षण: हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर विद्युत शॉक लागल्यास सीपीआर देण्याचे तंत्र.

त्वचेवरील प्रथमोपचार: विद्युत शॉकमुळे भाजणे किंवा इजा झाल्यास तातडीने करावयाचे उपचार.

या प्रशिक्षणामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली असून आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेडमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.