अंमलीपदार्थाचे व्यसनात अडकवीत ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून तरुणीचा छळ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी : तिघांविरुद्ध ‘पोक्सो’सह गंभीर गुन्हे दाखल; जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज, दारू आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी निर्मल दिनेश तिवारी (रा. प्रजापती नगर), जय चौधरी (रा. शिव कॉलनी) आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण एकाच शाळेत शिक्षण घेत होत्या. ऑक्टोबर २०२४ मध्ये मैत्रिणीने पीडितेला प्रथमच सिगारेट दिली. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये पीडितेचे आई-वडील गावाला गेलेले असताना, मैत्रिणीने तिला संशयीत आरोपी निर्मल तिवारी याच्यासोबत कारमधून नेले. यावेळी तिला सिगारेट, दारू आणि गांजाचे व्यसन लावण्यात आल्याचा आरोप आहे.

याच काळात मोहाडी रोड परिसरातील ट्रॅकवर कारमध्ये दारू पाजून निर्मल तिवारी याने तिच्यावर अत्याचार केला तसेच तिचे नग्न फोटो काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिला वारंवार विविध हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीने धमकी देऊन पीडितेला घरातून पळवून नेले आणि १५ एप्रिल २०२६ पर्यंत स्वतःच्या घरी डांबून ठेवल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

तसेच, पीडितेने आरोपीच्या घरी जाण्यास नकार दिल्यानंतर २७ मे २०२६ रोजी गौरव पुरोहित याने स्नॅपचॅटद्वारे अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तर जय चौधरी याने पीडितेच्या घराच्या परिसरात दोन ते तीन वेळा ड्रग्ज आणून दिल्याचेही तपासात समोर आले आहे.

सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पीडित तरुणीने आपल्या वडिलांसह ३ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध ‘पोक्सो’सह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.