भुसावळ (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चौघा निष्पाप भावंडांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात भुसावळ सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तीवाद केला.

या निर्णयामुळे जवळपास सहा वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा शेवट झाला असून पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हत्याकांडाने हादरला होता परिसर
रावेर तालुक्यातील बोरखेडा गावाजवळील मुस्तफा शेख यांच्या शेतात सालदार म्हणून महताब व रुमालबाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या पाच मुलांसह वास्तव्यास होते. १५ ऑक्टोबर २०२० रोजी हे दाम्पत्य आपल्या मूळ गावी मध्य प्रदेश येथे गेले होते.
दुसऱ्या दिवशी, १६ ऑक्टोबरच्या सकाळी शेतमालकाला त्यांच्या झोपडीत भीषण दृश्य दिसून आले. मोठी मुलगी सईता (१४), रावल (११), अनिल (८) आणि सुमन (३) यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आणि तपास सुरू केला. घटनास्थळावरून एक कुऱ्हाड जप्त करण्यात आली होती.
या चौघा भावंडांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.
तपासात आरोपीला अटक
पोलिसांनी तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत संशयित महेंद्र सिताराम बारेला या १९ वर्षीय तरुणाला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
न्यायालयाचा कठोर निर्णय
या प्रकरणाचा खटला भुसावळ सत्र न्यायालयात चालला. विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. कालच दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला होता.
आज न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि दुर्मीळ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपी महेंद्र बारेला याला फाशीची शिक्षा सुनावली.
या निकालामुळे जिल्हाभरात या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली असून, न्यायालयाच्या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत केले जात आहे.


