साकेगावात महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा : पाण्यासाठी महिला झाल्या आक्रमक, ग्रामपंचायत कार्यालयात केले ठिय्या आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी ) -तालुक्यातील साकेगाव येथे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आल्याने साकेगावातील महिलांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. गावातील वार्ड क्रमांक ४ आणि ५ मध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी बुधवारी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. यावेळी ग्रामसेवक व प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान मंगळवारी बालूमिया परिसरातील नागरिकांनीही ग्रामपंचायत प्रशासनाकडे गेल्या पाच सहा दिवसांनी येत नसल्याची तक्रार केली होती उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे साकेगावला तापी आणि वाघूर नदीचे पात्र लाभले असून एमआयडीसी जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरूनही गावाला पाणी मिळते. स्वतःच्या ग्रामपंचायतीच्या कूपनलिका ही कार्यरत आहेत. एवढे पाणी स्रोत उपलब्ध असतानाही नागरिकांना गोड पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

याप्रसंगी शकील पटेल, सचिन सपकाळे, साबीर पटेल, गजानन पवार, संतोष पाटील, संतोष कुरकुरे यांच्यासह वार्ड क्रमांक ४ व ५ मधील मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते.

पाण्याच्या प्रश्नावरून साकेगावात प्रशासन विरोधातील नाराजी उघडपणे समोर आली असून, या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गावात पाच ते सहा दिवसांनी येते पाणी

ग्रामपंचायतीकडे पाण्याचे स्त्रोत असूनही गावात पाच ते सहा दिवसांनी पाणी मिळत असल्याचा दावा केला जात आहे.टाकी रोज भरते, मग पाणी जाते कुठे?

आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते संतोष कुरकुरे यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारला ‘जर गावातील पाण्याची टाकी रोज भरली जात असेल, तर ते पाणी नागरिकांपर्यंत का पोहोचत नाही? नेमके पाणी जाते कुठे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.

ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा

पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याची तयारीही केली होती. मात्र काही लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. तरीही तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.