जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भुसावळ विभागात “हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन” जनजागृती अभियान

भुसावळ (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात “हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन” या विषयावर विविध पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विभागातील विविध रेल्वे स्थानके, रेल्वे वसाहती तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि हरित जीवनशैलीचा संदेश देणारे उपक्रम राबविण्यात आले.

“एक पेड़ माँ के नाम” या अभियानांतर्गत बडनेरा वसाहत आणि बुरहानपूर रेल्वे स्थानक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन, हरित वातावरण निर्मिती आणि निसर्ग संरक्षणाचा संदेश दिला. अधिकाधिक वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

तसेच जागतिक पर्यावरण दिन अभियानांतर्गत नाशिक रोड, जळगाव, पाचोरा आणि बुरहानपूर रेल्वे स्थानकांसह बडनेरा, चाळीसगाव, मूर्तिजापूर, मनमाड आणि खंडवा रेल्वे वसाहतींमध्ये पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या अभियानादरम्यान जनजागृती रॅली काढण्यात आली. रेल्वे कर्मचारी तसेच हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रवासी आणि नागरिकांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जागरूक केले. प्लास्टिक प्रदूषण कमी करणे, स्वच्छ परिसर राखणे आणि हरित जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही करण्यात आले.

मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या दैनंदिन कामकाजात शाश्वततेचा समावेश करून पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रवाशांनी पुनर्वापर करता येणाऱ्या बाटल्यांचा वापर करावा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून दूर राहावे तसेच स्थानकांवरील वर्गीकृत कचराकुंड्यांचा वापर करून स्वच्छ आणि हरित रेल्वे अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.