भुसावळ पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ. जळगाव एसीबीची धडक कारवाई : पंटर जाळ्यात; रजेवर असलेल्या उपनिरीक्षकाचा एसीबीकडून कसून शोध :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातून एक धक्कादायक लाचखोरी प्रकरण समोर आले असून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह एका खाजगी पंटराविरोधात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत खाजगी पंटराला ताब्यात घेण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील एका तक्रारदाराविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात अटक टाळून चॅप्टर केस न करण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती. नंतर ही रक्कम २० हजार रुपयांवर ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. गत महिन्यात एप्रिल २०२६ मध्ये ठरल्याप्रमाणे तक्रारदार रक्कम देण्यासाठी गेल्यानंतर उपनिरीक्षक व पंटराला संशय आल्याने प्रत्यक्ष लाच स्वीकारण्यात आली नाही. मात्र एसीबीच्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
शुक्रवारी पडताळणी अहवाल प्राप्त होताच जळगाव एसीबीचे पथक भुसावळात दाखल झाले. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे व खाजगी पंटर सलीम कुरेशी (रा. बोदवड) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, उपनिरीक्षक राजू सांगळे हे सध्या वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून एसीबीकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे. तर खाजगी पंटर सलीम कुरेशी याला एसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ही धडक कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या पथकाने केली.