वीर एकलव्य नगर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील वीर एकलव्य नगर येथे तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 28 मे 2026 रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन पीएलव्ही अधिकार मित्र सौ. संगीताताई राजेंद्र भामरे यांनी केले होते.

कार्यक्रमामध्ये विविध कायदे व योजनांबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये नाल्सा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना 2015, नाल्सा बालकांसाठी बालमैत्रीपूर्ण कायदेशीर सेवा योजना 2024, ऊसतोड कामगारांसाठी कायदेविषयक माहिती, पीडित भरपाई योजना, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (POCSO कायदा) तसेच बाल विवाह मुक्त भारत या विषयांचा समावेश होता.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रीटेनर लॉयर मनिषाताई बाविसकर उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित महिला, पुरुष तसेच लहान बालकांना कायद्याचे महत्त्व समजावून सांगितले. विशेषतः POCSO कायद्याअंतर्गत बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कसे करावे, मुलांनी कोणत्या गोष्टींबाबत सतर्क राहावे तसेच पालकांनी मुलांची काळजी कशी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी बालविवाहाला कायद्याने बंदी असल्याचे सांगत संबंधित कायद्यांविषयी माहिती देण्यात आली. तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार, ऊसतोड कामगार व महिलांना त्यांच्या हक्कांविषयी आणि शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. नाल्सा टोल फ्री क्रमांकाची माहिती देऊन न्यायालयामार्फत प्राप्त कायदेविषयक पत्रकांचे वितरणही उपस्थितांना करण्यात आले.

कार्यक्रमात परिसरातील महिला, पुरुष आणि लहान बालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. संगीता राजेंद्र भामरे यांनी प्रस्ताविक सादर केले. त्यानंतर मनिषाताई बाविसकर यांनी कायद्याचे सखोल मार्गदर्शन केले. सामान्य नागरिकांपर्यंत कायद्याची माहिती पोहोचवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमास रामदास शिरसाट, संजय भालेराव, सिद्धार्थ नवगिरे, देवीदास अवकारे, जितेंद्र भालेराव, जनाबाई बोरसे, सरला ठाकरे, सुरेखा पवार, अनुसयाबाई, भारतीबाई शांकर, माया पवार, शांताबाई पवार, संशात तडवी, यशोदाबाई मालुचे, जनाबाई भागले, ज्योतीताई महाजन, मालुताई नरवाडे, सुलक्षणाताई सावळे, संजनाताई गोडघाटे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान लहान बालकांना बिस्किट पॅकेट व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ. संगीताताई राजेंद्र भामरे, पीएलव्ही अधिकार मित्र यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले तसेच कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिक व बालकांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले.