दिलीप चौधरी
मा. कृषी अधिकारी

भुसावळ (प्रतिनिधी)- खरीप हंगाम २०२६ तोंडावर येऊन ठेपला असून शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. वाढती महागाई, निसर्गाचा प्रकोप, शेती निविष्ठांचे वाढते दर, जंगली प्राण्यांचा त्रास आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव या संकटांशी सामना करत शेतकरी आजही जिद्दीने शेती करत आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस मेहनत करून उत्पादित केलेल्या शेतीमालाला बाजारात मातीमोल किंमत मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. व्यापाऱ्यांकडून होणारी मनमानीही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
यावर्षीही अल निनोच्या संकटामुळे हवामानाचा लहरीपणा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक शेती करणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे आणि जमिनीची धूप थांबावी यासाठी शेताला उताराच्या आडवी मशागत तसेच उताराच्या आडवी पेरणी करावी. चार सरी सोडून एक खोल चर काढल्यास कमी पावसात पाणी साठून राहण्यास मदत होईल आणि अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाणी बाहेर जाण्याचा मार्ग उपलब्ध होईल.
बियाण्यांचे वाढते दर लक्षात घेता शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता घरीच तपासून घ्यावी. त्यासाठी ओल्या गोणपाटावर सोयाबीनचे शंभर दाणे समान अंतरावर ठेवून गोणपाट ओला करून सावलीत ठेवावा. तिसऱ्या-चौथ्या दिवशी उगवलेले दाणे मोजून उगवण क्षमता तपासावी. ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण झाल्यास ते बियाणे पेरणीस योग्य समजावे.
पेरणीपूर्वी बियाण्यांवर जैविक बीज प्रक्रिया केल्यास खतांवरील खर्च कमी होऊन पिकांची वाढ चांगली होते. तसेच रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून युरियाचा वापर मर्यादित करावा. पीक एक महिन्याचे झाल्यानंतर जीवामृताची पहिली फवारणी केल्यास पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढून पीक निरोगी राहण्यास मदत होते.
कीड नियंत्रणासाठी सुरुवातीलाच रासायनिक औषधांचा वापर न करता निंबोळी अर्काची फवारणी करावी. यासाठी आतापासून निंबोळ्या गोळा करून त्यापासून अर्क तयार करणे फायदेशीर ठरेल. शेतामध्ये जागोजागी पक्षी थांबे लावल्यास पक्षी पिकांवरील अळ्या खाऊन नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रणास मदत करतात. फवारणी करताना तीव्र आणि उग्र रासायनिक औषधांचा वापर टाळून टप्प्याटप्प्याने उपाययोजना कराव्यात. नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शेतकऱ्यांनी बांधावरील झाडांची तोड टाळावी. शेतीकामात अडथळा येत असल्यास झाडांच्या फांद्या छाटाव्यात; मात्र झाडे तोडू नयेत. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. प्रत्येक शेतकरी आणि नागरिकाने दरवर्षी किमान दोन झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. वृक्षसंवर्धन आणि शाश्वत शेती या काळाची गरज बनली आहे.
शेती टिकली तरच देश टिकेल. त्यामुळे शाश्वत शेती, कमी खर्चातील शेती आणि पर्यावरणपूरक उपाययोजना यांचा अवलंब करूनच भविष्यातील शेती सक्षम होऊ शकते.
– दिलीप चौधरी
मा. कृषी अधिकारी तथा
जळगाव जिल्हा जनसंपर्क अधिकारी
पर्यावरण संवर्धन व विकास समिती, महाराष्ट्र राज्य


