“मी फक्त दुधासाठीच का?” — मृत वासरासाठी रात्रभर गाईचा आक्रोश; गोसेवकांकडून अंतिम संस्कार

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील एका भागात माणुसकीला हादरवणारी घटना समोर आली. एका गायीचे नवजात वासरू कुपोषणामुळे दगावल्याने गाय रात्रभर आपल्या मृत वासराशेजारी उभी राहून हंबरडा फोडत होती. तिचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिक जमा होत होते, मात्र अनेकजण केवळ बघ्याची भूमिका घेत दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून आले.

माहितीनुसार, रात्री गायीने एका वासराला जन्म दिला होता. मात्र जन्मानंतर काही वेळातच कुपोषणामुळे त्या वासराचा मृत्यू झाला. सकाळी गाय आपल्या वासराला उठविण्याचा प्रयत्न करत मोठ्याने हंबरडा फोडत होती. जणू ती “माझ्या वासराला बघा, ते उठत का नाही?” अशी विनवणी करत असल्याची भावना उपस्थितांच्या मनात निर्माण झाली.

गायीची अवस्था अत्यंत व्याकुळ आणि संतप्त होती. रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांनी मार्ग बदलला, तरी गाय मृत वासराशेजारी ठामपणे उभी होती. अखेर गोभक्त अर्थव पाटील यांनी ही माहिती शहरातील गोसेवक रोहीत महाले यांना दिली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावले.

यानंतर गोसेवक अर्थव पाटील, रोहित महाले,बल्लु धायडे, कुणाल शिंदे आणि वैभव नेहते यांनी मृत वासराचा हिंदू वैदिक पद्धतीने अंतिम संस्कार केला. या वेळी उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

घटनेनंतर गोसेवक महाले यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हे माते, या कलियुगात माणसे स्वार्थासाठी नाती जपतात. तू तर आई आहेस, पण तुझा वापर अजुनही काही लोकांकडून फक्त दुधासाठीच केला जातो, हे आज पुन्हा सिद्ध झाले.”

तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “गोमाता आणि नंदीदेवांना गोतस्कर व कसाईसारख्या राक्षसी प्रवृत्तींपासून वाचवण्यासाठी समाजाने जागृत होणे आवश्यक आहे.”