जामनेर (प्रतिनिधी)-.: महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक एमआयएस-0526/प्र.क्र.56/विशा-1ब, दिनांक 21 मे 2026 नुसार गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांना प्रतिबंध करण्यासाठी जामनेर नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्यात आली.

ही मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी , मुख्याधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पार पडली. शासनाच्या निर्देशानुसार गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी शहरातील विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान घोडे पीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर तसेच इस्लामपूर भागात संयुक्त पथकाने अचानक छापेमार कारवाई केली. संशयित ठिकाणांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात जनावरे ताब्यात घेण्यात आली. सदर कारवाईत एकूण ५९ जनावरांची सुटका करण्यात आली असून नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून त्यांना सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले.
सदर जनावरांचे संगोपन व संवर्धन व्हावे यासाठी त्यांना जळगाव येथील गोशाळेत सुरक्षितरित्या रवाना करण्यात आले.
या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नगर परिषद आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत मोहीम यशस्वी केली.
जामनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल किंवा अनधिकृत कत्तलखान्यांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासन अथवा नगर परिषद आरोग्य विभागाशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


