भुसावळ( प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिका अग्निशमन विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून खोट्या फायर सेफ्टी प्रमाणपत्रांचे वितरण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागातील अधिकारी प्रशांत भोळे व काही कर्मचाऱ्यांनी दि. 29 एप्रिल 2025 रोजी क्रमांक 345 अंतर्गत बियाणी फार्मसी कॉलेज, गट नं. 96/1, मिरगव्हाण शिवार, जामनेर रोड, भुसावळ यांना फायर सेफ्टी सर्टिफिकेट दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अशाच प्रकारची अनेक प्रमाणपत्रे नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
सदर कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व प्राध्यापकांची उपस्थिती असते. अशा ठिकाणी अग्निसुरक्षेबाबत चुकीच्या किंवा बनावट स्वरूपाच्या प्रमाणपत्रांमुळे भविष्यात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, महाराष्ट्र शासनाने फायर सेफ्टी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार मालेगाव येथील फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस प्राधिकरणाला दिलेले असताना, स्थानिक पातळीवर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे अधिकार स्वतः वापरून प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पदाचा दुरुपयोग झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
नगरपालिका हद्दीतील तसेच हद्दीबाहेरील अनेक संस्थांना अशाच प्रकारे प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच चौकशी अहवालाची प्रत देण्यात यावी, अशी मागणी केदार सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे भुसावळ अग्निशमन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


