भुसावळ (प्रतिनिधी)-

शहरातील रामदेव बाबा मंदिराजवळील वर्षीय ३५ विजय जाधव तरुणावर कडगाव शिवारातील एका कंपनीच्या आवारात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात तरुणाचा डावा हात, गळां, हनुवटीवर कुत्र्याने चावा घेवून गंभीर जखमी केले. या तरुणावर ग्रामीण रुग्णालय व ट्रामला केअर सेंटरमध्ये उपचार केले.
शहरात तारकेश झोपे या ९ वर्षीय बालकाच्या मृत्यूनंतर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बालकाच्या मृत्यूच्या घटनेनंतर दररोज श्वानदंशाचे प्रकार घडत आहेत. मंगळवारी शहरातील खडकारोडवरील रामदेव बाबा मंदिर परिसरातील रहिवासी विजय एकनाथ जाधव (वय ३५) हे राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी हॉस्पिटलच्या भागात कडगावरोडवर मागीलअसलेल्या एका ऑइल पेंट कंपनीत कामाला आहेत.
मंगळवारी आवारात ते इतर कर्मचाऱ्यांसोबत. जेवण करीत होते. जेवणानंतर पुन्हा कामावर जाताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. डाव्या हाताचा पंजा थेट जबड्यात पकडल्याने त्यांनी हिसका देवून सोडवल्यानंतर या कुत्र्याने थेट त्यांच्या गळ्यावर चावा घेतला. या हल्ल्यात गळा, हात, हनुवटी आदींवर तब्बल आठ ते दहा दात उमटले आहेत. या घटनेनंतर विजय जाधव यांना ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरमध्ये प्रथमोपचार करुन रेबीज लसीकरण करण्यात आले.
कामाचा पहिलाच दिवस…
विजय जाधव या कर्मचाऱ्याचा मंगळवारी ऑइल पेंट कंपनीत कामाचा पहिलाच दिवस होता. कामाच्या पहिल्याच दिवशी त्याच्यावर कुत्र्याने हल्ला चढवून जखमी केले. मोकाट कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्येही दहशत वाढली आहे. जखमी विजय हे भुसावळातील रहिवासी असल्याने शहरात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.


