भुसावळ (प्रतिनिधी ) –
जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2026 च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण दिनावचे औचित्य साधून आज दिनांक 19.05.2026 रोजी भुसावळ विभागामार्फत विविध रेल्वे स्थानके व रेल्वे वसाहतींमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासंदर्भात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याच अनुषंगाने मुख्य वैद्यकीय अधीक्षक श्री शिव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव स्थानकावर विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्मवरील कचरा वर्गीकरण (Waste Segregation) संदर्भात विशेष अभियानांतर्गत जागरूक करण्यात आले. तसेच प्रवाशांना कचरापेटीचा योग्य वापर, जैविक व प्लास्टिकमुक्त पर्यावरणपूरक कटलरीच्या वापरास प्रोत्साहन, प्लास्टिकचा कमी वापर तसेच जैविक कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही योग्य कचरा वर्गीकरण व स्वच्छतेसंबंधी प्रक्रियांचे पालन करण्याबाबत संवेदनशील करण्यात आले.
जळगाव रेल्वे स्थानकावर सामाजिक कार्यकर्ते श्री मंदन लाठी यांच्या उपस्थितीत विशेष पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रवाशांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा कमी वापर करणे तसेच हरित जीवनशैली स्वीकारण्याबाबत जागरूक करण्यात आले.
या प्रसंगी विभागातील विविध रेल्वे स्थानके व वसाहतींमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान रेल्वे कर्मचारी व उपस्थित नागरिकांना स्वच्छ आणि हरित पर्यावरण राखण्यासाठी प्रेरित करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त विभागामार्फत आगामी काळातही विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.



