महावितरणच्या भोंगळ कारभारावर नगरसेवक संतप्त : खंडित विजेमुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशन विस्कळीत; कार्यकारी अभियंत्यांकडे व्यक्त केली तीव्र नाराजी :

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशन पूर्णपणे बिघडत असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी महावितरणच्या कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांची भेट घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या भागात पाणीपुरवठा सुरू असतो, त्याच भागात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पाणी भरता येत नसल्याची समस्या नगरसेवकांनी मांडली.

प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, भाजप गटनेते युवराज लोणारी यांच्यासह किरण कोलते, राजेंद्र आवटे, निक्की बत्रा, बबलू बहऱ्हाटे, प्राची पाटील, शोभा इंगळे, संतोष चौधरी, आशिष पटेल, आसिफ खान, विशाल नाटकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी दीपक धांडे, प्रशांत नरवाडे, उदय पाटील, रूपेश देशमुख, विलास सातदिवे, श्रेयस इंगळे यांच्यासह एकूण २२ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

नगरसेवकांनी सांगितले की, शहरात आधीच उन्हाळ्यामुळे १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पाणी भरता येत नाही. परिणामी पालिकेला अतिरिक्त पाणीपुरवठा करावा लागत असून संपूर्ण रोटेशन व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे.

यावेळी महावितरणच्या कॉल सेंटरच्या कामकाजावरही संताप व्यक्त करण्यात आला. “वीजपुरवठा खंडित झाला की कॉल सेंटरचे मोबाइल बंद ठेवले जातात. नागरिकांनी तक्रार करायची तरी कुठे?” असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. कॉल सेंटरमध्ये कार्यरत कर्मचारी सरकारी वेतन घेत असूनही कर्तव्यात कसूर करत असल्याचा आरोप करत कॉल सेंटरचे क्रमांक वाढवून ते कायम सुरू ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली.

तसेच ट्री कटिंगनंतर ठेकेदारांकडून रस्त्यावरच फांद्या व कचरा टाकून दिला जात असल्याने शहरात अस्वच्छता पसरत असल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला.

नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्यांवर योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांनी दिले.