भुसावळ (प्रतिनिधी) –

भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी दि. १८ रोजी आपल्या समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीच्या संदर्भात भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी वैचारिक मतभेद झाल्याने गेल्या महिन्यांमध्येच राजेंद्र चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला होता. रावेर लोकसभा क्षेत्रातील आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी शिवसेनेचे नेते खा. श्रीकांत शिंदे व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात नाशिक येथील एक्सप्रेस
इन हॉटेलच्या सभागृहात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेनेत प्रवेश केला.
त्यांच्यासोबत प्रा.डॉ. जतीन मेढे, भुसावळ शेतकी संघाचे संचालक प्रकाश चौधरी (वरणगाव), सुनसगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक व जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक जे.पी. सपकाळे, टहाकळीचे
माजी उपसरपंच शांताराम चौधरी, अंजनसोंडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच धनराज पाटील, राष्ट्रवादीचे रावेर पूर्वचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस आणि पत्रकार संघरत्न सपकाळे, अल्पसंख्यांक आघाडीचे बाबूलाल भाई, राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक न्याय पक्षाचे युवा कार्यकर्ते भूपेंद्र तायडे यांच्यासह
कार्यकत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रसंगी राज्याचे मंत्री ना. उदय सामंत, ना.दादा भुसे, माजी खासदार उमेश पाटील आदी उपस्थित होते. पुढील काळात रावेर लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.
पुढील कालखंडात रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. माजी सभापती राजेंद्र चौधरींच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळ तालुका आणि रावेर लोकसभा क्षेत्रातील राजकीय चित्र नक्कीच बदलण्याची संकेत प्रसंगी खा. उन्मेश पाटील यांनी सांगितले.


