भुसावळ (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त भुसावळ रेल्वे विभागात दि. 16 मे 2026 रोजी विविध जनजागृती व पर्यावरण जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीद्वारे प्रवासी व नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करण्यात आले. तसेच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
याशिवाय, हेल्थ अँड एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट (EnHM) पथकाच्या वतीने रेल्वे वसाहतींमध्ये विशेष रॅली आयोजित करण्यात आली. या माध्यमातून रेल्वे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व नागरिकांना स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैली स्वीकारण्याबाबत जागरूक करण्यात आले.
तसेच विविध रेल्वे स्थानकांवरील प्रवासी माहिती प्रणालीद्वारे पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि सिंगल यूज प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आले.
भुसावळ विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.



