भुसावळ (प्रतिनिधी )- जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात दि. 15 मे ते 5 जून 2026 या कालावधीत विविध जनजागृती, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रेल्वे कर्मचारी, प्रवासी तसेच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि हरित जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम “हवामान बदल आणि धरती मातेसमोरील वाढती आव्हाने” अशी आहे. त्यानिमित्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ यांच्या उपस्थितीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता राखणे तसेच शाश्वत आणि हरित जीवनशैली स्वीकारण्याची शपथ देण्यात आली.


कार्यक्रमाला विभागातील वरिष्ठ शाखा अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प केला.
दरम्यान, भुसावळ विभागातील सर्व युनिट्स, कार्यशाळा, लोको शेड, कोचिंग डेपो, कार्यालये आणि रेल्वे स्थानकांवरही पर्यावरण शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेप्रती आपली बांधिलकी अधिक मजबूत करत भुसावळ विभाग हरित व स्वच्छ रेल्वे उभारणीसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे प्रशासनाने सांगितले.


