औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद; नागरिकांनी अत्यावश्यक औषधांची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी – अन्न व औषध प्रशासन

जळगाव, दि. १५ : आखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २० मे २०२६ रोजी देशभरातील ठोक व किरकोळ औषध विक्री व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. दरम्यान, आपत्कालीन सेवा, शासकीय रुग्णालये तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी केमिस्ट बांधवांना बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. औषधे ही अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत येत असल्याने रुग्णांना औषधांचा पुरवठा न करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ व औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. रुग्णांना औषधांच्या अभावामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संघटनांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र.भा. अस्वार (मो. ९४२२३५६१४३) तसेच श्रीमती क. र. पाटील (मो. ९८६०१७२५६१) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने सांगितले असून नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.