धावत्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये गर्भवती प्रवासी महिलेची सुरक्षित प्रसूती; भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षकाची तत्परता ठरली जीवनदायी : रेल्वेतील मानवी संवेदनशीलतेचे उदाहरण; महिलेने दिला कन्यारत्नास जन्म

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक श्री आर. एस. तेली यांनी कर्तव्य बजावताना दाखवलेल्या तत्परता आणि मानवी संवेदनशीलतेमुळे धावत्या रेल्वेत एका गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती होऊन नवजात बालिकेचे प्राण वाचले. या घटनेमुळे प्रवासी तसेच रेल्वे प्रशासनाकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

दि. १० मे २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 22538 कुशीनगर एक्सप्रेसमध्ये श्री तेली हे ड्युटीवर कार्यरत होते. कल्याण स्थानक पार केल्यानंतर A/1 कोचजवळील जनरल डब्यातून एका प्रवाशाने माहिती दिली की, एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या असून डब्यातील मोठ्या गर्दीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून श्री तेली यांनी तत्काळ पुढाकार घेतला. कसारा स्थानक आल्यानंतर काही प्रवाशांच्या मदतीने संबंधित महिलेला सुरक्षितपणे A/1 कोचच्या कॅरी डोअर परिसरात आणण्यात आले. याचवेळी त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या नर्स/डॉक्टर श्रीमती पूजा खरगे यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सहाय्याने रेल्वेतच महिलेची सुरक्षित आणि नैसर्गिक प्रसूती करण्यात आली. महिलेने एका निरोगी कन्येला जन्म दिला.

दरम्यान, घटनेची माहिती तात्काळ मुख्य वाणिज्य नियंत्रक, मुंबई यांना देण्यात आली. त्यानंतर इगतपुरी स्थानकावर रुग्णवाहिका, स्ट्रेचर, डॉक्टर तसेच उप स्टेशन अधीक्षक यांची आवश्यक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. इगतपुरी स्थानकावर पोहोचल्यानंतर महिला व नवजात बालिकेला पुढील उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुख्य तिकीट निरीक्षक श्री आर. एस. तेली यांच्या कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि सेवाभावी वृत्तीमुळे एक मोठी आपत्कालीन परिस्थिती सुरळीतपणे हाताळली गेली. भारतीय रेल्वेच्या “प्रवासी सेवा आणि सुरक्षा” या बांधिलकीचे हे प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे.