भुसावळ(प्रतिनिधी)-
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठी खुशखबर दिली आहे. ओखा आणि तिरुपती दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाड्यांना आता नियमित एक्सप्रेस गाड्यांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, नियोजित आणि नियमित सेवा उपलब्ध होणार आहे.

सध्या चालू असलेल्या गाडी क्रमांक 09520/09519 ओखा–तिरुपती साप्ताहिक विशेष गाड्यांचे खालीलप्रमाणे नियमित सेवांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे:
- गाडी क्रमांक 19560 ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस — ११ मे २०२६ पासून
- गाडी क्रमांक 19559 तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस — १४ मे २०२६ पासून
गाड्यांची वेळापत्रक
गाडी क्रमांक 19560 ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस
ही गाडी दर सोमवार रोजी ओखा येथून रात्री ११.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 19559 तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस
ही गाडी दर गुरुवारी सकाळी ८.१५ वाजता तिरुपती येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११.५० वाजता ओखा येथे पोहोचेल.
महत्त्वाचे थांबे
द्वारका, खंभालिया, जामनगर, हापा, राजकोट, वांकानेर, सुरेंद्रनगर, विरमगाम, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, उधना, नंदुरबार, अमलनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, बोलारम, काचीगुडा, महबूबनगर, गदवाल, कर्नूल सिटी, डोन, ताडिपत्री, कडप्पा, राजमपेटा आणि रेनिगुंटा या स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे.
डब्यांची संरचना
या एक्सप्रेस गाडीत
- १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी
- ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी
- १० शयनयान
- ४ सामान्य द्वितीय श्रेणी
- २ सामान व गार्ड ब्रेक व्हॅन
अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाडी क्रमांकातील बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि थांबे जाणून घेण्यासाठी Indian Railways NTES संकेतस्थळाला भेट देता येईल. तसेच तिकीट बुकिंगसाठी RailOne App चा वापर करता येणार आहे.


