गौप्यस्फोट ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची पोलिसात तक्रार: आजोबांच्या जुन्या नोंदीत फेरफार झाल्याचा आरोप,

भुसावळ ( प्रतिनिधी )-
भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या आजोबांच्या नावाशी संबंधित नगरपालिकेतील जुन्या नोंदींमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून, याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीमुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित दस्तऐवजांमध्ये खाडाखोड करण्यात आली असून, त्यामागे काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असू शकते, असा गंभीर आरोप नगराध्यक्षा भंगाळे यांनी केला आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

दरम्यान, या कथित फेरफार प्रकरणाची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, प्राथमिक चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे भुसावळ शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.