नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा कहर ; 4 दिवसांत जवळपास २ लाख कोंबड्या नष्ट तर सव्वाआठ लाख अंडी फोडली…!

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भावाने गंभीर स्वरूप धारण केलं असून परिसरात कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांत जवळपास दोन लाख कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असून सव्वाआठ लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला. संशय आल्याने मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर प्रयोगशाळेच्या अहवालात बर्ड फ्ल्यू (H5N1) विषाणूची पुष्टी झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबवत कत्तल मोहीम सुरू केली.

१ मेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत विविध पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्य मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आले. पहिल्या दिवशी काही हजार पक्ष्यांपासून सुरू झालेली कारवाई पुढील दिवसांत झपाट्याने वाढत गेली. २ आणि ३ मे रोजीही मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा नाश करण्यात आला. तर चौथ्या दिवशी मुजतबा आणि परवेज पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल ५६ हजारांहून अधिक पक्षी नष्ट करण्यात आले.

एकूण आकडेवारीनुसार, चार दिवसांत १ लाख ९३ हजारांहून अधिक कोंबड्या, ८ लाखांपेक्षा जास्त अंडी आणि २१ टनांहून अधिक पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. या मोठ्या प्रमाणातील कारवाईमुळे कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

नवापूर हा भाग कुक्कुटपालनासाठी ओळखला जातो आणि येथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योग विकसित झाला आहे. मात्र, बर्ड फ्ल्यूच्या पुनरावृत्तीमुळे शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून पोल्ट्री उत्पादनांची वाहतूक आणि विक्रीवरही नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

सध्या नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे सुमारे ५० कर्मचारी आणि विशेष पथके या मोहिमेत कार्यरत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेमुळे नवापूरसह राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवस परिस्थिती कशी राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संग्रहित फोटो…