नरसापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार-हत्येच्या निषेधार्थ ब्राम्हण संघातर्फे प्रशासनाला निवेदन

भुसावळ ( प्रतिनिधी)-
पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ आज ब्राह्मण संघ भुसावळ यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या घटनेचा निषेध नोंदवत भुसावळचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, “अशा नराधमांनी समाजाच्या सहिष्णुतेचा अंत पाहू नये. शासनाने महिला व बालकल्याण संदर्भातील कायदे अधिक कडक करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी.”
या आंदोलनात संघाचे उपाध्यक्ष गजानन जोशी, श्रीमती कल्पना दामले, रामभाऊ गचके, माधवपूरकर, डॉ. दावलभक्त, गाडगीळ, जयप्रकाश शुक्ला, कैलास उपाध्याय, रमाशंकर दुबे, रमेश जोशी, सौ. जोशी तसेच असंख्य समाजबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.