भुसावळ (प्रतिनिधी) – शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांना पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.

भुसावळ नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे गायत्री गौर-भंगाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत स्वतःला अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रजनीताई सावकारे यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
मात्र, निवडणुकीनंतर त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आणि तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर झालेल्या चौकशीत जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. या निर्णयामुळे त्यांच्या पदावर संकट निर्माण झाले होते.
दरम्यान, २३ एप्रिल रोजी संबंधित प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्यानंतर शासनाने भूतलक्षी प्रभावाने त्यांना नगराध्यक्षपदावरून अपात्र घोषित केले आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


