नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी स्वीकारला पदभार

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दलात आज पदभार हस्तांतरण सोहळा संपन्न झाला. जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे सुपूर्द केली. या सोहळ्यानिमित्त जळगाव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना यावेळी भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, गुन्हेगारीवर बसवलेला वचक आणि राबवलेले विविध जनहितार्थ उपक्रम यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. पोलीस दलातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली. नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जळगाव पोलीस दलाच्या परंपरेनुसार त्यांचे स्वागत करण्यात आले. श्रीकांत ढीवरे यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला मोठा फायदा होईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दल अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी विविध विभागांना भेटी देत माहिती जाणून घेतली.