झुंबा फिटनेस व डान्स शिबिराचा समारोप; 200 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव (प्रतिनिधी ) – नारीशक्ती बहुद्देशीय संस्था आणि ड्रॅगन्स डान्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय झुंबा फिटनेस व डान्स प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप झाला. या शिबिरात तब्बल 200 महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

शिबिराचे उद्घाटन महापौर सौ. दीपमाला काळे यांच्या हस्ते झाले होते. समारोप समारंभात माजी महापौर जयश्री महाजन, सिंधुताई कोल्हे, श्रद्धा नखाते, डॉ. नीलिमा सेठीया आणि अभिलाषा चराटे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी प्रभावीपणे पार पाडले. यावेळी मंचावर नारीशक्ती संस्थेच्या मनीषा पाटील, ड्रॅगन्स डान्स अँड फिटनेसच्या डॉली आनंदकुमार आणि मुख्य प्रशिक्षक बी. आनंदकुमार उपस्थित होते.

या शिबिरामध्ये सहभागी महिलांना बॉलीवूड डान्स, झुंबा फिटनेस, फिटनेस एरोबिक्स, योग्य आहार, वजन कमी करणे (वेट लॉस) आणि इंचेस लॉस याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक डॉली आनंदकुमार आणि बी. आनंदकुमार यांनी प्रभावी प्रशिक्षण देत महिलांना फिटनेसबाबत प्रोत्साहित केले.

शिबिरादरम्यान उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या तेजल वनरा, रंजिता सोनार, नीता पाटील, भावना पाटील, रेणुका हिंगु, आशा मौर्य, नेहा मौर्य, राधिका पाटील, पूर्णिमा धांडे, दिशा ठाकूर, श्रावणी पाटील, मोनिका तळेले आणि जयश्री पाटील यांना स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

समारोप कार्यक्रमास हर्षा गुजराती, स्मिता पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.