भुसावळात पोलिसांचे मिशन ऑल आऊट :

भुसावळ (प्रतिनिधी)

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी भुसावळ पोलिस उपविभागाने गुरुवारी मध्यरात्री ऑल आऊट ऑपरेशन राबवले. डिवायएसपीकेदार बारबोले यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा, नाहाटा चौफुली आणिदीपनगर यांसारख्या संवेदनशील नाक्यांवर केलेल्या कारवाईमुळे – गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. – या मोहिमेत एकाच रात्री १०६ बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई, शहरासह हायवेवर नाकाबंदी, ८ तळीराम जेरबंद करीत तब्बल ७१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत पोलिसांनी शहराचे सर्व प्रवेशद्वारांवर पोलिस थांबले होते. गांधी पुतळा आणि नाहाटा चौफुली या प्रमुख ठिकाणी एकूण ४१८ वाहनांची तपासणी केली.

संशयास्पद वाहनांच्या डिकीची आणि कागदपत्रांची तपासणी केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते. गांधी पुतळ्याजवळ निरीक्षक उध्दव डमाळे यांनी स्वतः थांबत वाहनांवर कारवाई केली. यावेळी शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह वाहतूक शाखेचे कर्मचारी सुध्दा तैनात केले होते. सदर कारवाई डीवायएसपी केदार बारबोले, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांसह उपविभागातील सर्व सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.

गुन्हेगारांची झाडाझडती

पोलिसांनी या मोहिमेत केवळ नाकाबंदी न करता ‘हिस्ट्री शीटर’ (रेकॉर्डवरील गुन्हेगार) आणि हद्दपार करण्यात आलेल्या १० संशयितांची प्रत्यक्ष घरी जाऊन तपासणी केली. तसेच शहरांमधील ३२ हॉटेल्स आणि लॉजची तपासणी करून अनधिकृत वास्तव्याबाबत माहिती घेतली.

स्वतंत्र पथक तयार केले

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले. नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हद्दपार व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. – केदार बारबोले, डीवायएसपी, भुसावळ,