चित्रकार मेजर रॉबर्ट गिल स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन : आर्टीस्ट व्हिजन फाउंडेशनतर्फे उपक्रम:


अजिंठा लेणी”जगाच्या नकाशावर पोहोचवणारे पहिले चित्रकार मेजर रॉबर्ट गिल अजूनही उपेक्षितच ! कलावंत आणि मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना.

भुसावळ (प्रतिनिधी) -“अजिंठा भित्तिचित्रे” जगाच्या नकाशावर आपल्या अप्रतिम चित्रकलेद्वारे पोहोचवणारे पहिले चित्रकार मेजर रॉबर्ट गिल आजही उपेक्षितच राहिले आहेत, अशी खंत मान्यवरांनी व्यक्त केली. आर्टीस्ट व्हिजन फाउंडेशनतर्फे मेजर रॉबर्ट गिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ शहरातील ख्रिश्चन दफनभूमीत त्यांच्या स्मृतीस्थळी मेणबत्ती प्रज्वलन व सामूहिक प्रार्थनेद्वारे अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य राजू महाजन (चोपडा) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मेजर गिल यांनी आपले संपूर्ण आयुष्य अजिंठा भित्तिचित्रांच्या जतन व प्रसारासाठी समर्पित केले, मात्र त्यांच्या कार्याची अपेक्षित दखल घेतली गेली नाही.

यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रकार राजू बाविस्कर, सप्तपूत ललित कला भवनाचे प्राचार्य अतुल मालखेडे, मध्य रेल्वे भुसावळचे सीनियर डी.ई.एन. समन्वय पंकज धावरे, आर्टीस्ट व्हिजन फाउंडेशनचे राजेंद्र जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

“काळया निळ्या रेषा” या आत्मकथनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल राजू बाविस्कर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, इतिहास अभ्यासक प्रा. उत्तम सुरवाडे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अजिंठा भित्तिचित्रांचा प्रसार देशभर करण्यासाठी पर्यटन विभाग, केंद्र शासन व रेल्वे विभाग यांच्यात समन्वयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

पोवाड्याचे प्रकाशन
डॉ. सतीश कुलकर्णी लिखित मेजर रॉबर्ट गिल यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचे कोड स्कॅनद्वारे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सेंट्रल स्कूलच्या संगीत शिक्षिका सौ. स्मिता कुलकर्णी यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

प्राचार्य राजू महाजन यांनी मेजर रॉबर्ट गिल यांच्या समाधीचा शोध लावणारे प्रख्यात चित्रकार स्व. प्रकाश तांबटकर तसेच अजिंठा भित्तिचित्रांचे अभ्यासक डॉ. पी. डी. जगताप यांच्या कार्याचा गौरव केला.

याच वेळी अजिंठा विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकालही जाहीर करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीकांत जोशी, रमाकांत भालेराव, विकास चौधरी, मनोहर झांबरे, श्रीकांत पवार, जयश्री चौधरी, युवराज लोधी, नितीन जे. अडोकमल यांच्यासह अनेक कलावंतांचे सहकार्य लाभले.