भुसावळमध्ये जैन धर्मीयांचा भव्य पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात :

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरात जैन समाजाच्या वतीने पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने भगवानाच्या अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर घाटयात्रेला प्रारंभ करण्यात आला.

या भव्य मिरवणुकीत भक्तिमय संगीत, गजराज (हत्ती), घोडे, बग्गी, अष्टकुमारिका, इंद्र-इंद्राणी यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले भाविक हे विशेष आकर्षण ठरले. भगवानाची प्रतिमा पालखीतून नेण्यात आली असून, कीर्तनकारांच्या उपस्थितीत संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

ही मिरवणूक दिगंबर जैन मंदिर, आठवडे बाजार येथून सकाळी ६ वाजता सुरू झाली. शहरातील विविध मार्गांवरून — भारत मेडिकल, अष्टभुजा मंदिर, साई जीवन प्रोफेसर कॉलनी मार्गे रिंग रोडवरील भव्य जैन मंडप येथे मिरवणुकीचा समारोप झाला.

या घटयात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. संपूर्ण भुसावळ शहर अहिंसेच्या संदेशाने भारावून गेले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, ३० मार्च रोजी भगवान महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणकानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गांधी चौक येथील प्राचीन दिगंबर जैन मंदिरातून सुरू झालेल्या या मिरवणुकीत आचार्य १०८ श्री विभवसागरजी महाराज, स्वात्मनंदी महाराज तसेच आर्यिका संघ यांचा सानिध्य लाभला.

मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. हत्ती-घोड्यांवर आरूढ होऊन, डीजे व बॅण्डच्या तालावर भक्तांनी उत्साहात सहभाग नोंदवला. मुख्य बाजारपेठ, जामनेर रोड मार्गे संतोषी माता हॉल येथे मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.

यानंतर आचार्य विभवसागरजी महाराज यांनी भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनावर आधारित प्रवचन केले. “जियो आणि जीने दो”, सत्य व अहिंसा या तत्त्वांचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्य कार्यक्रमस्थळी ध्वजारोहण व पंडाल पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या संपूर्ण सोहळ्यामुळे भुसावळकरांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्याचे सौभाग्य लाभले.