जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना कायदे व आरोग्य विषयक मार्गदर्शन – किमया बहुउद्देशीय संस्था व तालुका विधीसेवा समितीचा उपक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी ) – साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे तालुका विधी सेवा समिती व किमया बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथे आज दि. 2८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता कायदे व आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र खंडारे होते. यावेळी शिक्षक व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅडव्होकेट सौ जास्वंदी भंडारी व रिटेनर ॲड अभिजित मेने , स्त्री रोग तज्ञ डॉ सौ सुवर्णा गाडेकर, पत्रकार उज्वला बागुल, यांनी मार्गदर्शन केले.

अ‍ॅडव्होकेट सौ जास्वंदी भंडारी यांनी पॉक्सो कायद्याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की , POCSO कायदा (Protection of Children from Sexual Offences Act, 2012) हा भारतातील मुलांच्या (१८ वर्षांखालील) लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे संरक्षणासाठी बनवलेला महत्त्वाचा कायदा आहे. मुलांवर होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांना रोखणे,व पीडित मुलांना न्याय आणि संरक्षण देणे हा मुख्य उद्देश आहे . जर, १८ वर्षांखालील कोणतेही मुलगा किंवा मुलगी यांना लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार , वारंवार त्रास देणे, धमकी देणे आदी कोणी करीत असले तर त्याची त्वरीत तक्रार करा असे आवाहन केले. या कायद्याअंतर्गत गुन्ह्याच्या प्रकारानुसार कडक शिक्षा होते काही प्रकरणांत आजीवन कारावाससुद्धा व दंड आणि तुरुंगवास दोन्ही लागू होऊ शकतो, पॉक्सो कायद्यान्वये मुलांची गोपनीयता राखली जाते मुलाची ओळख उघड केली जात नाही यासाठी प्रकरणे लवकर निकालासाठी जलदगती न्यायालये आहेत. पिडीत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा , 1098 (Childline) वर फोन करून मदत मिळवू शकतो अत्याचार होत असेल तर शिक्षकांना सांगावे किंवा विश्वासात जे असतील त्यांना सांगावे असेही त्या म्हणाल्या.

तर ॲड अभिजित मेने यांनी. NALSA म्हणजे National Legal Services Authority (राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण). हा भारतातील लोकांना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी तयार केलेला संस्थात्मक ढाचा असल्याचे सांगत NALSA म्हणजे सर्वसामान्य लोकांना न्याय सहज आणि मोफत मिळावा यासाठीची सरकारी व्यवस्था सांगून नालसा विषयी विविध उपयुक्त अशी सविस्तर माहिती दिली. Nalsa चा महत्वाचा उद्देश म्हणजे सर्वांना न्याय मिळवून देणे, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना तसेच गरीब व गरजू नागरिक , महिला व मुले , अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) , अपंग व्यक्ती , आपत्तीग्रस्त किंवा पीडित व्यक्ती यांना न्याय देणे. मुख्य कामे मोफत वकील उपलब्ध करून देणे , न्यायालयीन खर्चात मदत लोक अदालत मध्ये समेटाने व जलद निर्णय आयोजित करणे कायदेविषयक जनजागृती करणे याचा समावेश आहे. तसेच बाल विवाह मुक्त कायद्याबाबत थोडक्यात माहीती दिली.

तर डॉ सुवर्णा गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी हेतू साध्य करण्यासाठी शारीरिक आरोग्या सोबतच मानसिक आरोग्यसुद्धा कसे चांगले असले पाहिजे याचे महत्व विविध उदाहरणे देऊन पटवून सांगितले की , उत्तम आरोग्य हे जीवनाचे खरे धन आहे. उत्कृष्ट आणि संतुलित आहारामुळे शरीर निरोगी राहते. नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयींनी आरोग्य सुधारते. विद्यार्थ्यांनी योग्य मार्गसीदर्शन घेऊन आपले ध्येय ठरवावे. कष्ट, शिस्त आणि सातत्य यामुळे यश नक्की मिळते. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून खेळीमेळीने समुपदेशन केले.
कार्यक्रमाचे आयोजन विधी सेवा समितीच्या समांतर विधी सहाय्यक पत्रकार उज्वला बागुल यांनी केले. यावेळी त्यांनी विधी सेवा समितीच्या कार्याचे महत्त्व विशद केले. समिती गरजू व वंचित घटकांना मोफत कायदेशीर मदत पुरवते. लोकअदालतीचे आयोजन, कायदेविषयक जनजागृती, समुपदेशन व मध्यस्थी, विशेष घटकांना सहाय्य, कैद्यांना कायदेशीर मदत आदी उपक्रमांद्वारे सर्वांसाठी न्याय सुनिश्चित करण्याचे कार्य समिती करत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

प्रसंगी विधी सेवा समिती उपक्रमाचे कौतुक करीत समाजात गुन्हे होऊ नये यासाठी कायदे असतात व न्यायव्यवस्था आहे . सर्वांनी दक्षता घ्या , अन्याय वअत्याचार होऊ नये यासाठी सदैव सजग रहा असा मौलिक सल्ला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र खंडारे यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली सूत्रसंचलन प्रा श्री सराटे सर यांनी केले. यशस्वीतेसाठी जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आयोजकांनी परिश्रम घेतले.