वरणगाव — शहरातील शासकीय जागांवर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांविरोधात नगरपालिकेने कठोर पावले उचलत सुमारे ३०० व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. थकीत भाडे तात्काळ भरणे आणि मुदत संपलेल्या जागा रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत कार्यकाळात उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलांतील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. मात्र, अनेक करारांची मुदत संपल्यानंतरही गाळेधारकांनी जागा ताब्यात ठेवली असून मोठ्या प्रमाणात भाडे थकीत असल्याचे पालिकेच्या तपासणीत आढळले. नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर नव्या नियमांनुसार या प्रकरणाची छाननी करून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकापासून भोगावती नदीपर्यंतच्या प्रमुख व्यापारी पट्ट्यातील दुकानांवर या मोहिमेचा विशेष फोकस आहे. नोटिशीनुसार, संबंधितांनी १० दिवसांच्या आत थकीत रक्कम भरून जागा रिकामी करणे बंधनकारक आहे. आदेशाचे पालन न केल्यास पालिका थेट कारवाई करून गाळे ताब्यात घेणार असून त्याचा खर्चही संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.
व्यापाऱ्यांचा विरोध तीव्र
पालिकेच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे. “ही केवळ ३०० गाळेधारकांची बाब नसून त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. अचानक अशा नोटिसा देणे अन्यायकारक आहे,” असे संघटनेचे अध्यक्ष विलास मुळे यांनी सांगितले. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पालिकेची भूमिका ठाम
पालिका प्रशासनाने मात्र आपली भूमिका स्पष्ट करत नियमांनुसारच कारवाई सुरू असल्याचे सांगितले. “मुदत संपलेले करार आणि थकीत भाडे यामुळे वसुली व नूतनीकरणासाठी नोटिसा देणे आवश्यक होते,” असे उपमुख्य अधिकारी रशीद नौरंगाबादी यांनी स्पष्ट केले.
या कारवाईमुळे पुढील काही दिवसांत पालिका आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


