जळगाव (प्रतिनिधी ) — राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. १५० दिवसांच्या या विशेष कार्यक्रमाची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्यातील शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन कॉलिटी कौन्सलिंग ऑफ इंडीया मार्फत सात निकषांवर करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी १८८ गुण मिळवत प्रथम स्थान मिळवले.
प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी जळगाव प्रशासनाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. संकेतस्थळाचे आधुनिकीकरण, ‘आपले सरकार’ पोर्टलची अंमलबजावणी, ई-ऑफिस प्रणालीचा १००% वापर, डिजिटल डॅशबोर्ड, तसेच ‘सेतूदूत जळगाव’ व्हॉट्सअॅप चॅटबॉटसारखे उपक्रम राबवण्यात आले.
नागरिकांना २४x७ सेवा देण्यासाठी चॅटबॉटद्वारे अर्ज स्थिती, तक्रार नोंदणी आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच डिजिटल डॅशबोर्ड मुख्यमंत्री डॅशबोर्डशी जोडण्यात आल्याने विविध योजनांची रिअल-टाइम माहिती मिळत आहे.
याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून शासकीय गोदामांतील धान्य साठ्याचे निरीक्षण, स्वयंचलित मोजणी आणि सुरक्षा देखरेख केली जात आहे. GIS तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य, शिक्षण, जलस्रोत आणि पायाभूत सुविधांचा स्थानिक डेटाबेस तयार करण्यात आला असून त्यामुळे नियोजन अधिक अचूक झाले आहे.
या यशामुळे जळगाव जिल्हा राज्यातील ई-गव्हर्नन्स क्षेत्रात एक आदर्श ठरला आहे.


