भुसावळ पालिका सभा : १७६ विषयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ पालिकेच्या ३ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेतील १७६ विषय कलम ३०८ नुसार रद्द करावे, यासाठी भाजपने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर मंगळवारी सुनावणी झाली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी २ एप्रिलची तारीख दिली. तोपर्यंत या १७७विषयांची अंमलबजावणी करु नये. ते तूर्त स्थगित ठेवण्याचे आदेश दिले.

पालिकेच्या ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपने १७६ विषय नामंजूर केले होते. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने हे ठरावही प्रोसिडिंगवर विरोधाची नोंद घेवून मंजूर केले. हे विषय कलम ३०८ नुसार रद्द करण्याची मागणी भाजपने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर मंगळवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. या सुनावणीला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, भाजपचे गट नेते युवराज लोणारी व नगरसेवक उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायासनासमोर सुरु असलेल्या प्रकरणात भाजपतर्फे अॅड. संदीप ठाकरे व अॅड. बोधराज चौधरी यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अॅड. मनोज कात्यायनी, अॅड. योगश दलाल यांनी काम पाहिले. दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर अर्धा तास युक्तीवाद केला. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील सुनावणीसाठी २ एप्रिल ही तारीख दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांकडील बाजा ऐकून घेतल्या. युक्तिवादानंतर २ एप्रिल ही कामकाजाची तारीख दिली. तोपर्यंत पालिकेने त्या १७६ ठरावांची अंमलबजावणी करु नये. ते पुढील निर्णयापर्यंत स्थगित ठेवावे असे आदेश दिले आहेत. यावेळी भाजपचे नगरसेवक निर्मल कोठारी, पिंटू ठाकूर, किरण कोलते अॅड. बोधराज चौधरी, पुरुषोत्तम नारखेडे रुपेश देशमुख, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर उपस्थित होते.