जळगाव (प्रतिनिधी) – प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवाच्या औचित्याने रामनवमी निमित्त जळगाव शहरात भव्य ‘रामरंग : भक्तीचा आणि सुरांचा संगम’ या भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता अयोध्यानगर येथील राममंदिर मित्र मंडळाच्या परिसरात रंगणार आहे.

औद्योगिक वसाहत परिसरातील अयोध्यानगर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ‘भक्तीनाद’ ग्रुपकडून सुमधुर भजनांची मैफल सादर करण्यात येणार आहे. भक्ती आणि संगीताचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी यानिमित्ताने जळगावकरांना मिळणार आहे.

या भजन संध्येत सुप्रसिद्ध भजन गायक पं. नारायणभाई ओझा तसेच प्रसिद्ध गायिका भानूप्रियाजी आपल्या सुरेल आवाजात प्रभू श्रीरामांवरील भजने सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे आकर्षक आणि प्रभावी निवेदन प्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे करणार आहेत.

रामजन्मोत्सवाचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित भजने, अभंग आणि विविध सुश्राव्य गीते सादर केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या भक्तिमय वातावरणात सहभागी होऊन प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


