रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २१ मार्च २००१ रोजी काही समाजसेवी तरुणांनी स्थापन केलेल्या या क्लबने सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करत भुसावळ शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रौप्य महोत्सवानिमित्त प्रभाकर हॉल, भुसावळ येथे २१ मार्च रोजी सायंकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गेल्या २५ वर्षांत क्लबचे नेतृत्व करणाऱ्या सर्व माजी अध्यक्षांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यामध्ये अभय हरणे, सुशील राका (धुळे), योगेश यावलकर (पुणे) यांच्यासह अनेक मान्यवर माजी सदस्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येणाऱ्या वर्षाचे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजेश पाटील, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय भाऊ सावकारे तसेच भुसावळ येथील प्रगतशील उद्योजक अश्विनभाई परदेशी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत रोटरी परिवाराने हा सोहळा दिमाखात पार पाडला.

रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी हा गेल्या काही वर्षांपासून भुसावळ शहरातील एक क्रीडा,कला व विविध सामाजिक विषयांमध्ये भरीव कार्य करणारी प्रभावी सामाजिक संस्था म्हणून उदयास आलेली आहे याचा प्रत्यय भुसावळकरांनी अनेकदा घेतलेला आहे.भुसावळकरांच्या सेवेमध्ये रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीने गेल्या काही वर्षांत रोटरी दांडिया, सायक्लोथॉन, भुसावळ रन, भुसावळ ऑलिंपिक, वृक्षारोपण, उन्हाळ्यात जलसेवा, तसेच ‘भुसावळ प्राईड अवॉर्ड’ यांसारखे विविध उपक्रम राबवून समाजसेवेचा ठसा उमटवला आहे.

यावेळी क्लबची स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली असून तिचे संपादन रोटेरियन श्रीकांत जोशी यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष देवा वाणी, सचिव हरमित सिंग माखन, प्रोजेक्ट चेअरमन हरविंदर सिंग तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.