भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील वांजोळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. २५ रोजी श्री मरी मातेच्या यात्रेनिमित्त “बारा गाड्या” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पारंपरिक सोहळ्यात भगत मोहन रामा मोरे हे बारा गाड्या ओढणार असून मुकेश मोरे व गोपाळ मोरे हे बगले म्हणून सहभागी होणार आहेत. मागील वर्षी भगत सिताराम मोरे यांनी हा मान मिळवून बारा गाड्या ओढल्या होत्या.

यात्रेनिमित्त गावात विविध प्रकारची दुकाने उभारली जाणार असून , खेळणी, पाळणे तसेच सौंदर्य प्रसाधनांची विक्री होणार आहे. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय रात्री भिमा नामा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ग्रामस्थांसाठी आकर्षण ठरणार आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ वाल्मिक सोनवणे, संजय भोई, जगदीश भोई तसेच होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
ही यात्रा शांततेत पार पाडावी व सर्वांनी यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलीस पाटील संतोष कोळी, सरपंच मंगलाबाई कोळी, उपसरपंच देविदास सावळे, अन्नपूर्णा जगदिश दोडे, इंदूबाई समाधान मोरे, संजय तायडे, विक्रम मोरे, सामाजिक कार्यकर्ते हरीष पाटील, जगदिश दोडे, भागवत मोरे, मुकुंदा सावळे, पत्रकार किशोर सावळे तसेच ग्रामपंचायत व विकास सोसायटी सदस्यांनी केले आहे.


