भुसावळ विभागात १० तिकीट तपासणी कर्मचारी ‘करोडपती’; महसूलवाढीत विक्रमी कामगिरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महसूलवाढीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तिकीट तपासणी मोहिमेद्वारे उत्पन्न वाढवत विभागातील तब्बल १० कर्मचारी ‘करोडपती’ ठरले आहेत.

याआधी सात कर्मचाऱ्यांनी हा टप्पा पार केला होता. आता आणखी तीन कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ₹१ कोटींपेक्षा अधिक महसूल जमा करत या विशेष यादीत स्थान मिळवले आहे. नव्याने ‘करोडपती’ ठरलेले तिघे कर्मचारी पुढीलप्रमाणे:

  • अल्विन गायकवाड (टीटीआय, भुसावळ)
  • पी. के. सिंग (सीटीआय, भुसावळ)
  • आर. के. गुप्ता (सीटीआय, भुसावळ)

या सर्व कर्मचाऱ्यांनी तिकीट तपासणीदरम्यान विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करून ₹१ कोटींपेक्षा अधिक महसूल जमा केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे रेल्वेच्या महसुलात मोठी भर पडली असून, अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यातही यश आले आहे.

रेल्वे प्रशासनाने त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत ही यशोगाथा इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या कामगिरीमुळे तिकीट तपासणी विभागाची प्रतिमा अधिक उंचावली असल्याचेही नमूद करण्यात आले.

दरम्यान, रेल्वेकडून प्रवाशांना अधिकृत माध्यमांतूनच तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. IRCTC संकेतस्थळ, स्थानकांवरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा ‘Rail One’ ॲपद्वारे तिकिटे घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विनातिकिट प्रवासाविरोधात ‘शून्य-सहिष्णुता’ धोरण कायम ठेवत प्रवाशांना सुरक्षित व सन्मानजनक प्रवास अनुभव देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.