नाशिक (प्रतिनिधी ) – सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे प्रवासी सुविधांच्या उन्नतीकरणासाठी महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत ६ मीटर रुंदीच्या नवीन पादचारी उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात होत आहे. या कामासाठी कि.मी. १८७/६-८ येथे असलेल्या विद्यमान पादचारी पुलावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील जिना (भुसावळ दिशेकडील) दिनांक २५ मार्च २०२६ पासून प्रवाशांच्या वापरासाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. नवीन पादचारी पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पायाभरणीच्या उत्खननाचे तसेच विद्यमान संरचनेच्या विघटनाचे काम या कालावधीत करण्यात येणार आहे.

प्रवाशांनी याची नोंद घ्यावी की, प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील लिफ्ट सुविधा पूर्ववत सुरू राहील. तसेच, इतर उपलब्ध पादचारी पूल व पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, या कामांमुळे भविष्यात अधिक सुकर, सुरक्षित आणि सक्षम प्रवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली असून सर्व प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.


